२१ मे रोजी विधान परिषदेच्या निवडणुका
ठाणे
२१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली.
करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.