ठेकेदार गायब ठाकुर्लीत काम करणारे ५२ परप्रांतिय कामगारांचे हाल

ठेकेदार गायब ठाकुर्लीत काम करणारे ५२ परप्रांतिय कामगारांचे हाल



डोंबिवली


कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून अचानक लागू झालेल्या लॉकडाउनमुळे ठाकुर्लीत काम करणारे ५२ कामगार अडकून पडले आहेत. ठेकेदाराने दोन महिन्यांपासून पगारच दिला नसल्यामुळे या कामगारांची उपासमार होत आहे. या भागात मदतही पोहोचत नसल्यामुळे हे कामगार हतबल झाले असून ठेकेदारानेच वा यावर सोडल्यामुळे आता मदत तरी कोणाकडे मागायची? असा सवाल ते करत आहेत. ठाकुर्ली पश्चिमेतील रेल्वेच्या पॉवरहाउसनजीक रेल्वेचे लोखंडी भंगार तोडण्यासाठी, त्या सामानाचे कटिंग करून ते उचलणे, गोळा करणे यासाठी ठेकेदारी तत्त्वावर काम सुरू आहे. या ठिकाणी ते काम करून रेल्वेच्याच ठाकुर्ली पश्चिमेकडील एका जुन्या इमारतीमध्ये हे कामगार वास्तव्यास आहेत.


हे परप्रांतीय कामगार असून त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जायला मिळणार, असा संदेश मिळताच त्यांनी तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना 'ह' प्रभागात पाठवण्यात आले; मात्र तेथे आधी टाळाटाळ झाली. अखेर रविवारी सकाळी त्यांनी फॉर्म भरून दिला. गावी जाण्यास परवानगी मिळाली तरी त्यासाठी पैसे कुठून आणायचे? ठेकेदाराने हेल्परला दिवसाला ५५० रुपये ठरवून येथे आणले. मात्र, लॉकडाउनमुळे कामच बंद झाले. जेवढे पैसे होते, ते खर्च झाले आहेत. दुकानेही बंद असतात.कोणाची मदत आली तर अन्नपाकिटांवर तो दिवस जातो. अन्यथा उपासमार होत असल्याची व्यथा या कामगारांनी मांडली.


आता १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. काहींच्या मते जूनपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याने आमच्या हालात भर पडणार आहे.   आम्ही २५ जानेवारीपासून येथे कामाला आलो आहोत. ठेकेदाराचे गॅसकटिंग, ट्रकमध्ये भंगार सामान लोड करण्याचे काम सुरू होते. दोन महिन्यांपासून हाल सुरू आहेत. फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पगार दिला आहे. पण मार्च, एप्रिलमध्ये आम्हाला पगार मिळालेला नाही. दोन वेळा हजार रुपये दिले होते, पण आता तेही मिळत नाहीत. आम्हाला उत्तर प्रदेशातील आमच्या गावाला जायचे आहे. तेथे जाण्यासाठी तरी पैसे द्या.ठेकेदाराने आमचे थकलेले वेतन द्यावे आणि जाण्याची व्यवस्था करावी.आम्हाला आता काहीच सुचत नसून कोणी तरी आम्हाला मदत करावी आणि या संकटातून सोडवावे, -अशी याचना कामगारांच्या वतीने आनंद यादव, अखिलेश यादव, नागेंद्र चौरसिया, सुरेश कनौजिया आदी  कामगारांनी केली आहे.