कोरोना उपचाराकरिता खासगी रुग्णालयांमध्ये एका व्यक्तीस किमान ७५ हजारांचा खर्च
ठाणे
करोनाबाधित असलेल्या रुग्णावर दहा ते १४ दिवस या कालावधीत उपचार केले जातात. त्यामुळे हा कालावधी लक्षात घेतल्यास खासगी कोव्हिड रुग्णालयात दाखल होणे सर्वसामान्यांसाठी महागडेच ठरेल, अशी चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना कोव्हिड उपचार रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये मुक्काम राहिल्यास त्याला किमान ७५ हजारांचे शुल्क आकारले जाऊ शकते, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. करोनाबाधित रुग्ण आढळल्यास अशा रुग्णावर उपचारादरम्यान किमान १४ दिवस त्याचे विलगीकरण केले जाते. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा १० ते १४ दिवसाचा खर्च ७५ हजारापर्यंत पोहोचत आहे.
गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार खासगी कोव्हिड रुग्णालयातील सामान्य कक्षामध्ये उपचारासाठी रुग्णाकडून प्रतिदिन चार हजार रुपये आकारले जाणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरिंग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार,तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रुपये आकारले जाणार आहेत. त्यात रुग्णखोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे, तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रुपये आकारले जाणार असून व्हेंटिलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रुपये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रुग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा रुग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.