ग्रामीण भागातील ४२ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले

काळजी करू नका, काळजी घ्या ; कोरोना रुग्ण बरे होत आहेत !


ग्रामीण भागातील ४२ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले


 प्रतिबंधित क्षेत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी करा


                    मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे  



ठाणे 


जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४२ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले आहेत. ही सकारात्मक बाब असून कोरोना रुग्ण बरे होत असून काळजी करू नका, काळजी घ्या असे आवाहन करत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्या परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज ( मंगळवार ) त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व संबधित यंत्रणांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, सर्व तालुक्याचे संपर्क अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.


ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी  जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा आटकाव करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात आरोग्य विभागा अंतर्गत शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग यांच्या मदतीने जलद सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे.


१२ लाख ४७ हजार २२१ जणांचे सर्वेक्षण


आता पर्यंत ग्रामीण भागात १८५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी ४२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७४ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून ८२४ जणांची टीम या ठिकाणी सर्वेक्षण करत आहेत. आतापर्यंत या टीमने १२ लाख ४७ हजार २२१ जणांचे सर्वेक्षण केले आहे.


कोव्हीड केअर आणि विलगीकरण कक्षाची उभारणी


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद , जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जलद पावलं उचलत असून आताच्या घडीला तीन विलगीकरण कक्ष आणि दोन कोव्हीड केअर सेंटर निर्माण करण्यात आलेले आहेत. यामध्ये टाटा आमंत्रा भिवंडी, बीएसयुपी सोनिवली बदलापूर , जोंधळे कॉलेज शहापूर याठिकाणी  विलगीकरण कक्ष आहेत. तर बीएसयुपी सोनिवली बदलापूर , जोंधळे कॉलेज शहापूर याठिकाणी  कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.