ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे
ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक असुन आज अखेर पर्यत ७९८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल २० हजार ९२४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील १५ हजार ९२३जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर २७०७ जण कोरोनाग्रस्त आहेत. आज अखेरपर्यंत ८० जणांचे मृत्यू झाले आहेत.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या जास्त होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. नियमांचे पालन आणि संयम यावरच ही लढाई आपल्याला जिंकता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
करोनाबाधितांना लवकरात लवकर करोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होईल. नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या पालन करावे. नागरिकांनी घरी रहावे व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.