कोरोना योध्द्यांचा 50 लाखांचा विमा काढावा
नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी
ठाणे
ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डॉक्टर्स आणि नर्सेस अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनावर प्रत्यक्ष नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नियमित साफसफाई करत आहेत. तर ठाणे मनपा शिक्षक प्रत्येक विभागात जाऊन कोण आजारी आहे का किंवा कोणाला ताप येत आहे का याचे सर्व्हेक्षण करत आहेत. सुरक्षा रक्षकही या यंत्रणेचा भाग असल्याचे कृष्णा पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना योध्द्यांचा 50 लाखांचा विमा काढावा, अशी मागणी बुधवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रत्येक निवडणुक पॅनल स्तरावर समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने या समितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिला बचत गटातील महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. या समिती मार्पत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वॉर्डस्तरावर प्रत्यक्ष काम करणार आहेत. दुर्दैवाने जर यातील कोणाला कोरोनाची बाधा झाली तर त्याला उपचाराचा खर्च परवडणारा नाही. तसेच महापालिकेच्या माध्यमातून जनकल्याण कृती समिती चे 48 कार्यकर्ते लोकमान्य नगर, शास्त्राrनगर, इंदिरा नगर या भागांत सर्वेक्षणाचे काम करत होते. 20 हजार नागरिकांचा सर्व्हे या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र दुर्दैवाने यातील 12 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, समाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांचा 50 लाखांचा विमा काढवा अशी मागणी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.