बारवी धरणात ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक
बदलापूर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. परिणामी उद्योगधंदे आणि मोठय़ा आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात यंदा मोठी बचत झाली असून त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांवर पाणीकपातीचे संकटही दुर झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक तसेच नागरी पट्टय़ाचा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या बारवी धरणात यंदा एप्रिल महिन्यात कधी नव्हे ते ५३ टक्के इतका भरीव असा पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षांत राज्यात आणि विशेषत: ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. बारवी धरणाच्या शेजारी असलेल्या बदलापूर आणि कर्जतसारख्या शहरांना दोनवेळा पुराचा फटका बसला. तर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. त्यानंतर काही दिवस त्यातून विसर्गही करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षांत पुरेसा जलसाठा धरणात उपलब्ध होता. टाटा जलविद्य्ुात प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे उल्हास नदी बारमाही झाली आहे. त्यामुळे उल्हास नदीतून आणि एमआयडीसीच्या बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रांना आणि नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट येणार नाही असेच सुरुवातीपासून वातावरण होते. तरीही पुढील नियोजनाचा भाग म्हणून एप्रिल महिन्याच्या मध्यावर काही प्रमाणात पाणीकपातीचे वेळापत्रक आखले जाईल, अशी शक्यता पाटबंधारे विभागातील सूत्र व्यक्त करत होते. मात्र, करोनामुळे उद्योगांचा कार्यभार जवळपास ठप्प झाल्याने या क्षेत्राला लागणाऱ्या पाण्याची मोठी बचत होऊ लागली आहे.