टाळेबंदीमुळे मजुर उपलब्ध नसल्याने प्रमुख शहरांचा अन्नधान्याचा पुरवठा रोडावला

टाळेबंदीमुळे मजुर उपलब्ध नसल्याने प्रमुख शहरांचा अन्नधान्याचा पुरवठा रोडावला



ठाणे


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत पुरेसा साठा असतानाही गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरास होणारा अन्नधान्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या बरोबरीने धान्याचे दरही वाढू लागले आहेत. करोनाचे संकट निर्माण होताच माथाडी तसेच माथाडी कामगारांनी काम बंद केले.


त्यामुळे या बाजारात मालाचे चढ-उतार करण्याचे काम मंदावले असून मुंबई, ठाण्यातून या बाजारात खरेदीसाठी येणारे किरकोळ व्यापारीच त्यांच्या कामगारांमार्फत हे काम करताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये किराणा मालाची काही ठराविक दुकाने सध्या उघडी असताना दिसत आहेत. तसेच अनेक किरकोळ विक्रेत्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्याने पूर्वीसारखा उठाव नसल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


टाळेबंदीमुळे देशांतर्गत होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वस्तू आणि मालाची वाहतूक सुरु आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या मालाचे ट्रक गेल्या आठवडय़ात राज्यात विविध ठिकाणी अडवले जात होते. त्यामुळे बाजार समितीतील मालाची आवक घटली होती. गेल्या काही दिवसांपासून वाशी कृषी उत्पन्न बाजारात भाजीपाला, फळे, अन्न धान्याची आवक सुरळीत सुरु झाली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे बाजारात काम करणारे अनेक हमाल कामावर उपस्थित राहू शकत नसल्याने प्रमुख शहरांचा अन्नधान्याचा पुरवठा रोडावला आहे. कामगार नसल्यामुळे बाजारात माल उतरवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती मिळत आहे.