आनंद परांजपे यांनी केली करोनावर मात
ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे एका नेत्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनीही करोनावर मात केली. करोनामुक्त झाल्यानंतर मधुकर कड ठाण्यात आले होते. आनंदनगर टोलनाक्यावर परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. वाहनातून उतरल्यानंतर कड यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. सहकाऱ्यांचं हे प्रेम पाहून मधुक कड यांना अश्रू अनावर झाले होते.