महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना 'अँटी कोरोना किट'चे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना 'अँटी कोरोना किट'चे वाटप



ठाणे


'कोरोना' महामारीचा राज्यासह ठाण्यात प्रादुर्भाव होत असताना यास्थितीत मोलाची कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे मात्र ठाणे महानगर पालिकेचे अद्यापही दुर्लक्षच आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केवळ टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केल्या गेले. मात्र त्यांच्या मुलभूत गरजा अद्यापही भागवल्या गेल्या नाहीत  तुटपुंज्या साधनांच्या मदतीने शहराची निगा राखणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेकडे ठाणे पालिका प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलेले आहे असा आरोप मनसेने केला आहे.


शहराचा कानाकोपरा साफसूफ ठेवणाऱ्या या स्वच्छतादूतांकडे पुरेशी साधने नसूनही ते 'कोरोना विरोधात लढा देत आहेत त्यांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सफाई कर्मचाऱ्यांना 'अँटी कोरोना किट'चे वाटप करण्यात आले. याप्रश्नी पालिका आयुक्तांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासनही मनसेच्यावतीने देण्यात आले. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना ठाणे शहरातही दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाऊन असूनही आरोग्य कर्मचारी, पोलीस कोरोना सोबत दोन हात करत आहे.


त्या धर्तीवर सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता ठेवण्याचे काम करतात. मात्र त्यांच्याकडे मूलभूत सोयीसुविधा नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची गरज ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे आणि विभाग सचिव मयूर तळेकर यांनी त्यांना सॅनिटायझर, मास्क, गल्होज आदी साहित्यांच्या अँटी कोरोना किटचे रविवारी सकाळी वाटप केले.


सफाई कर्मचाऱ्यांची ही अवस्था अत्यंत विदारक असून पालिकेने या घटकाकडे नीट लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विभाग सचिव मयूर तळेकर यांनी मांडले. तर तब्बल ३५०० कोटींपेक्षा अधिक अर्थसंकल्प असलेल्या ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांची अवस्था निंदनीय असून त्यांचा कोणताही विमा नसणे, ही शरमेची बाब असर यांचे म्हणणे आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या या पालिकेच्या सफाई कामगारांची ही अवस्था पाहता याप्रश्नी लवकर विजय सिंघल यांची भेट घेऊन प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.