दाट लोकवस्ती असलेल्या दिव्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ
ठाणे :
ठाणे शहरातील कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता दाट लोकवस्ती असलेल्या दिव्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिव्यात कुठे चाळी तर कुठे इमारती या दाटीवटीने उभ्या आहेत. त्यामुळे आता येथे खबरदारीचे उपाय करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. दिवा हा भाग दाट लोकवस्ती भाग म्हणून ओळखला जातो. चाळींची संख्या देखील येथे जास्त आहेत, इमारती देखील दाटीवटीने वसल्या आहेत. येथे जवळ जवळ पाच लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे आता पहिला रुग्ण सापडल्याने येथील पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी पालिकेने चोख पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनीत हा रुग्ण आढळला आहे.सदर रुग्ण हा उल्हासनगर भागात वास्तव्यास होता, त्यानंतर तो दिव्यात आला होता. परंतु त्याला होम क्वॉरन्टाइन करुन ठेवण्यात आले होते. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला आहे. परंतु या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, त्याच्या संपर्कात अन्य कोण कोण आले आहेत, किंवा कोणामुळे त्याला याची लागण झाली याचा तपास आता सुरु झाला आहे. दरम्यान आता तो ज्या हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी गेला होता. ते दिव्यातील हॉस्पीटल क्वॉरन्टाइन करण्यात आले असून मुंब्रा देवी कॉलनीचा अर्धा भागही सील करण्यात आला आहे. तर त्याच्या घरातील अन्य चार जणांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दुसरीकडे मुंब्रा अमृत नगर भागातही एक रुग्ण वाढला असून या भागातील ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्याच्या घरातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर कळवा,खारेगाव भागातही कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.