ठाणे महापालिकेने केली शहरातील वेगवेगळ्या भागांतील खासगी रुग्णालये कोविडकरिता राखीव
ठाणे
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढू लागला आहे. या संकटाचा फैलाव वेगाने होत असल्याचे लक्षात येताच ठाणे महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांतील खासगी रुग्णालये कोविडकरिता राखीव असल्याचे जाहीर केले. पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले एक मोठे रुग्णालय अद्यापही कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले जात नसल्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी इतर काही खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने जाहीर केलेल्या कोविड रुग्णालयांची वाट अनेकांना धरावी लागत आहे. शासकीय रुग्णालयांवर पडणारा भार लक्षात घेता आता ही खासगी रुग्णालये महापालिकेने भाडय़ाने घ्यावीत आणि तेथे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार द्यावेत, असा प्रस्ताव पुढे आला आहे. करोनाची चाचणी करून घेण्यासाठी लागणारे शुल्क आणि त्यानंतर आवश्यक उपचारांसाठी महापालिकेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या खासगी कोविड रुग्णालयांमध्ये येणारा खर्च यांमुळे ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आसपासच्या परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण चाचणी आणि उपचारांसाठी पुढेच येत नसल्याची भीती आता ठाणे महापालिकेस वाटू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक दुर्बल घटकांमधील रहिवाशांना या आजाराची लागण वेगाने होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. जिल्हा शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असले तरी येथील क्षमताही तोकडी ठरू लागली आहे. खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होण्यास आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण तयार नसतात, असा अनुभव आरोग्य यंत्रणेस आला आहे. त्यामुळे लक्षणे दिसत असूनही यापैकी अनेक रुग्ण चाचणी व उपचारांसाठी पुढे येत नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.