डॉक्टर कुटुंबियांचे घरातच विलगीकरण, संकुलातील रहिवाशांचा विरोध
इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार
ठाणे
ठाण्यातील वसंतविहार भागात डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलींसोबत राहतात. ठाण्यात त्यांचे मोठे रूग्णालय आहे. रविवारी संबंधित डॉक्टरला करोनाची लागण झाली. या घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांचीही चाचणी केली. या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी त्यांचे घरातच विलगीकरण करण्यात आले होते. संकुलातील काही रहिवाशांनी अशा विलगीकरणास विरोध करण्यास सुरूवात केली. परंतु सोमवारी त्यांच्या चाचण्यांचे अहवालही आले आणि त्यांना संसर्ग नसल्याचे निष्पन्न झाले. या डॉक्टरचे घर प्रशस्त आहे. त्यामुळे घरात विलगीकरण करणे शक्य आहे असे महापालिका आणि वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांचेही म्हणणे होते. असे असतानाही वसाहतीमधील रहिवाशांनी अशा विलगीकरणास विरोध केला, अशी तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
एकीकडे डॉक्टर करोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे नागरिकांकडून त्यांचा सन्मान होण्याऐवजी असे प्रकार घडत असतील तर डॉक्टरांनी त्यांचे काम कसे सुरु ठेवायचे असा सवाल असोसिएशनने महापौर नरेश म्हस्के तसेच महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना केला आहे. उच्चभ्रू वसाहतीत रहाणारे रहिवाशी असे अशिक्षित आणि असंस्कृत असल्यासारखे वागत आहेत, अशी प्रतिक्रीयाही या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधात महापालिकेमार्फत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. करोनाची लागण झालेल्यांना किंवा संशयितांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत असताना आता ठाण्यातील उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टर कुटुंबालाही अशा अनुभवास सामोरे जावे लागत आहे. संबंधित डॉक्टरला करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे घरातच विलगीकरण करण्यात आले होते. मात्र, संकुलातील रहिवाशांनी त्याला विरोध दर्शविला. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.