कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी `बारामती पॅटर्न'च्या धर्तीवर `ठाणे पॅटर्न'ची निर्मिती करावी 
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी `बारामती पॅटर्न'च्या धर्तीवर `ठाणे पॅटर्न'ची निर्मिती करावी 

नगरसेवक हणमंत जगदाळे यांची मागणी 

 


 

ठाणे

 

कोरोना व्हायरसच्या बाबतीत विविध उपाययोजना राबविताना त्यामध्ये सुसूत्रीपणा असावा म्हणून `बारामती पॅटर्न'च्या धर्तीवर `ठाणे पॅटर्न'ची निर्मिती करावी अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आपण स्वत आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन आणि विविध कर्मचारी आपापल्या परिने प्रयत्न करीत आहेत. परंतु ठाणे शहरातील दाटीवाटीचा, कामगारवस्तीचा तसेच झोपडपट्टीचा परिसर पाहता अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी महाराष्ट्र शासन व महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन अडचणींप्रमाणेच आरोग्याच्या अडचणींसंदर्भात जे काही शासन आणि प्रशासकीय निर्णय घेतले जात आहे, त्यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 

वास्तविक सद्य परिस्थितीमध्ये आपणा सर्वांवर आलेल्या या प्रसंगावर आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन कोरोनाचा मुकाबला करण्याची हीच वेळ आहे. विविध उपाययोजना राबविताना त्यात सुसूत्रीपणा असावा म्हणून `बारामती पॅटर्न' प्रमाणे आपल्या नेतृत्वाखाली `ठाणे पॅटर्न' तयार करून ठाणे शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे, अशी मागणी हणमंत जगदाळे यांनी केली आहे. 

 तसेच या ठाणे पॅटर्नमध्ये स्थानिक नगरसेवक, पोलिस प्रतिनिधी, महापालिका प्रतिनिधी, अन्नधान्य पुरवठा प्रतिनिधी, महापालिका आरोग्य विभाग प्रतिनिधी आणि प्रभागातील किमान 10 एन.जी.ओ. असे मिळून एकत्रित काम केल्यास यावर मात करण्यास मदत होईल असे नमूद करून या सूचनेचा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली आहे.