करोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिका प्रशासनाला कळवा
शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना खबरदारीच्या सूचना
ठाणे :
ठाणे शहरातील एका खासगी रुग्णालयातून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर या रुग्णालयातील ३३ कर्मचारी आणि नऊ रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची वेळ आली आहे. असे प्रकार नवी मुंबई आणि अन्य शहरांतूनही उघड होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. करोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिका प्रशासनाला कळवावी, अन्यथा संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.
ठाण्यातील एका रुग्णालयात १८ ते २३ मार्चदरम्यान उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. मात्र, रुग्णाची तब्येत पुन्हा बिघडल्यानंतर त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने ठाण्यातील ज्या रुग्णालयात उपचार घेतले होते, त्या रुग्णालयातील ३३ कर्मचारी व नऊ रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.