केंद्राकडून मात्र केशरी धारकांसाठी काहीही धान्य मिळालेले नाही - मुख्यमंत्री

केंद्राकडून मात्र केशरी धारकांसाठी काहीही धान्य मिळालेले नाही - मुख्यमंत्री



मुंबई :


'कोरोना'च्या ( Covid19 ) संघर्षात लोकांच्या दैनंदिन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने केशरी शिधावाटपधारकांना गह व तांदूळ अल्प दरात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून मात्र केशरी धारकांसाठी काहीही धान्य मिळालेले नाही. केंद्राने फक्त तांदूळ दिले आहेत. हे तांदूळ विशिष्ट लाभार्थ्यांसाठीच आहेत. परंतु गरीब व मध्यमवर्गीयांसाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या तिजोरीतून मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


कोरोनाच्या ( Covid19 ) अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या माणूसकी हाच धर्म महत्वाचा आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, परप्रांतीय असे कोणतेही भेद करू नयेत. अशा सगळ्या लोकांना सरकार मदत करीत आहे. शिवभोजन योजनेतून आता दररोज एक लाख लोकांना पाच रूपयांत जेवण मिळेल. आवश्यकता असेल तर ती संख्या आणखी वाढवू. सरकारी यंत्रणेने विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अन्नछत्रे उभारली आहेत. त्या ठिकाणी दररोज ५ ते ५.५० लाख लोकांना एक वेळ नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत दिले जात आहे.


केंद्राने धान्य दिले आहे, मग ते वाटले का जात नाही, असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. पण मी तुमचा गैरसमज दूर करतो. केसरी शिधापत्रकधारकांसाठी केंद्राने कोणतेही अन्नधान्य दिलेले नाही. ठराविक लाभार्थ्यांसाठी फक्त तांदूळ दिले आहेत. त्याचे वाटप सुरू झाले आहे. आम्ही केसरी शिधावाटपधारकांनाही धान्य पुरवणार आहोत. ८ रुपयांत ३ किलो गह व १२ रुपयांत २ किलो तांदूळ असा पुरवठा करणार आहोत. या केशरीधारकांना धान्य मिळायला हवे यासाठी मी नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. आम्हाला आधारभूत किंमतीने विकत धान्य दिले तरी चालेल. महाराष्ट्र सरकार ते खरेदी करायला तयार आहे अशीही मागणी मोदींकडे केल्याचे ठाकरे म्हणाले.