देशभरात आजपासून उघडणार दुकाने; तूर्त मॉल्स राहणार बंद
नवी दिल्ली:
केद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी म्हणजेच आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. त्याचवेळी शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्त बंदच राहणार आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने फार मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिली असून लाखो दुकानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र करोना हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने दुकाने उघडण्याची सवलत देताना काही अटी घातल्या आहेत. जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. रमजानचा महिना सुरू झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती उघडण्यास मनाई असेल. ही दुकाने ३ मे पर्यंत उघडता येणार नाहीत. सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नसेल. त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने मात्र उघडता येणार आहेत, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले.