प्रभागात सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे : महापौर

प्रभागात सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर नरेश म्हस्के



ठाणे


ठाणे शहरात गेल्या काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे  कोरोनाबाधीत रुग्‍ण आढळून आल्यास महापालिकेच्यावतीने  नागरिकांचा सर्व्हे करण्यासाठी वैद्यकीय पथकांबरोबरच शासकीय कर्मचारी नियुक्त केले  आहे. या  कर्मचाऱ्यांना योग्य  माहिती देणे, त्यांच्यापासून कोणतीही माहिती लपवून न ठेवता स्वत:हून माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येतील या दृष्टीने लोकप्रतिनीधीनी प्रभागातील नागरिकांना आपल्या स्तरावर  योग्य ती  समज द्यावी, किंबहुना त्यांचे प्रबोधन करावे. तसेच आपल्याकडे माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी लोकप्रतिनिधी व नागरिकांना केले आहे.


संपूर्ण जग  कोरोना व्हायरसमुळे त्रस्त असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे व यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असेल अशा व्यक्तींच्या संपूर्ण कुटुंबाची, ते राहत असलेल्या परिसरातील नातेवाईक, मित्रमंडळी व कामाच्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा सर्व्हे करुन गरज भासल्यास त्यांचे ‍विलगीकरण करुन त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत, यासाठी स्थानिक स्तरावर महापालिकेच्यावतीने नियुक्त केलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी,  शिक्षक  त्या त्या विभागात सर्व्हे करण्यासाठी  जात आहेत व हे सर्व कर्मचारी आपल्या जिवावर उदार होवून काम करीत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्ती सहकार्य न करता त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यापासून माहिती लपविणे, दमदाटी करणे, कोंडून ठेवणे, त्यांचेजवळील कागदपत्रे  फाडून टाकणे असे अत्यंत गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास येत असून असाच प्रकार आज एका विभागात घडला आहे.  नागरिकांनी सर्व्हेसाठी आपल्या घरी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरुन कोरोनाचा वाढता फैलाव टाळण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय  करु शकतो.


आजवर कोरोनाबाधीत रुग्णांचा इतिहास पाहिल्यास सदरचा आजार हा कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात इतर जण आल्यामुळेच होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यासाठी महापालिका व जिल्हाप्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी  निश्चीत केलेल्या उपाययोजना  अंमलात आणण्यासाठी नागरिकांना योग्य ती माहिती देण्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.