१६ हजाराहून अधिक मजूर अडकलेत १६४ छावण्यांमध्ये
ठाणे :
ठाणे जिल्ह्यात इमारत बांधकामाच्या ठिकाणी सुमारे १६४ मजूर छावण्यांमध्ये १६ हजार ८३२ मजूर अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या छावण्यांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. त्याचवेळी त्यांच्याशी संवादही साधला जात असल्याने मजूर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी हजारो मजूर अडकून पडले असून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर ते आपली व्यथा मांडत आहेत. सर्वच मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले असल्याने गावी जाऊ द्या, अन्यथा कामे सुरू करा, असे साकडे ते अधिकाऱ्यांसमोर घालत आहेत.
बांधकाम व्यवसायिकांच्या ८४ मजूर छावण्या असून त्यामध्ये १५ हजार ११७ मजूर राहत आहेत. जिल्हा प्रशासन आणि ठाणे महापालिका प्रशासनाकडून या काळात ८१ छावण्या सुरू करण्यात आल्या. येथे १ हजार ७१५ मजुरांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. महसुली अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणादरम्यान येथील मजुरांच्या निवासाची व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, अन्नाची व्यवस्था, सुका शिधा, आरोग्य व्यवस्था आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची पाहणी केली जात आहे. या मजुरांनीही या अधिकाऱ्यांसमोर त्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कामे सुरू झाल्यास आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल, असे कामगारांचे म्हणणे आहे. शारीरिक अंतर राखून कामे सुरू करणे शक्य असल्याने अशा कामांना परवानगी देण्याचा आग्रहही त्यांनी धरला.