कोरोनाचे संकट दूर झाल्यावर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करु

कोरोनाचे संकट दूर झाल्यावर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करु
नानासाहेब इंदिसे यांचे आवाहन



 ठाणे 


‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: भारतीय’ असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला सांगितले आहे. असे सांगणारे डॉ. बाबासाहेब हेच खरे राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे आता राज्य आणि देशावर आलेले कोरोनाचे महासंकट दूर सारण्यासाठी आपणही राष्ट्रभक्तीचा प्रत्यय देत देशाच्या भाग्यविधात्याची जयंती घरामध्येच वंदन करुन साजरी करावी; कोरोनामुळे आलेली संचारबंदी दूर झाल्यानंतर आपण सर्वजण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची जयंती सार्वत्रिक आणि मोठ्या उत्साहात साजरी करु,  असे आवाहन रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांनी आंबेडकरी समुदायाला केले आहे.  
सध्या देशावर कोरोनाचे महासंकट आलेले आहे. हे संकट घालवण्यासाठी राज्य सरकार चांगले काम करीत आहे. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळेच मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमधील स्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे कौतूकच केले पाहिजे. पण, त्याचवेळी बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती आपल्यामध्येही जागवण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी देशाला प्रथम महत्व दिले होते. आज राज्यावर आलेले हे संकट दूर करायचे असेल तर आपण प्रखर राष्ट्रभक्ताप्रमाणे घरात बसणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या मंगळवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीच्या अनुषंगाने आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करीत असते. मात्र, हा जल्लोष साजरा करण्यापूर्वी आपण थोडे गंभीर होण्याची गरज आहे. जयंतीच्या जल्लोषासाठी रस्त्यावर आल्यास कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे घरातच आपल्या महापुरुषांसमोर नतमस्तक होऊन जयंती साजरी करावी, असे आवाहन नानासाहेब इंदिसे यांनी केले आहे.
दरम्यान,  येत्या 11 एप्रिलि रोजी राष्ट्रपिता जोरिाव फुले यांची; 14 एप्रिलला बाबासाहेबांची; 7 मे रोजी तथागत गौतम बुद्धांची जयंती आहे. या महामानवांच्या जयंतीचा कार्यक्रम संचारबंदी- लॉकडाऊन उठल्यानंतर आपण सर्वजण एकत्रित आणि मोठ्या जल्लोाषात साजरी करु, असेही नानासाहेब इंदिसे यांनी म्हटले आहे.