दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई
मुंबई पोलीस दलातील दोन हवालदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. कोरोनाशी लढा देणा-या महाराष्ट्र पोलिसांना ५० लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच केली होती.
दुर्दैवाने मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचा-यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. आम्ही त्यांना आवश्यक ते सर्व देऊ, असे देशमुख म्हणाले.
गेल्या दोन दिवसात मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांचा बळी गेला. मुंबई पोलीस दलातील ५२ वर्षीय हवालदाराचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तर शनिवारी ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबललाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता.