यांनी तर संकटाच्या काळातही इव्हेंट करायचं ठरवलं आहे
ठाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मेणबत्ती लावून करोनाविरुद्धची सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ ट्विट करत मोदींच्या या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. मला वाटलं मोदी आजच्या संदेशात वेगळं काही सांगतील. भारताने करोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्कची कमतरता पडू देणार नाही, देशासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरच्या मागे आम्ही उभे आहोत, लॉकडाऊनच्या काळात एकही गरीब उपाशी झोपणार नाही, असं काही तरी सांगणं मोदींकडून अपेक्षित होतं. पण यांनी तर संकटाच्या काळातही इव्हेंट करायचं ठरवलं आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
म्हणे, अंधार करा आणि बॅटरी पेटवा. मोदीजी देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असा हल्लाही आव्हाड यांनी चढवला आहे. ही टीका करताना आव्हाड यांनी 'नागिन' या जुन्या हिंदी चित्रपटातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटोही पोस्ट केला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये 'नव्या निरोचा जन्म' आणि 'अंधेरी रात में दिया तेरे हाथ में', असं ट्विटही त्यांनी केलं आहे.
पंतप्रधानांनी रविवारी सर्वांना संध्याकाळी दिवे किंवा मेणबत्ती लावून करोना विरुद्धची सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. देशाला इतकेही मुर्खात काढू नका. मोदींनी तर संकटातही इव्हेंट करायचं ठरवलंय, अशी टीका करतानाच देशात नव्या निरोचा जन्म झालाय, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे.