अरुणाचल प्रदेशमधील अनामिक दहशतीमुळे भयभीत
ठाणे :
चीनच्या नागरिकांसारख्या दिसणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार सध्या वाढीस लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यात राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशमधील 10 ते 12 विद्यार्थी या अनामिक दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांनी स्वत:ला घरात कोंडुन घेतले होते. या विद्यार्थ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेल्याने हा प्रकार समोर आला.
याबाबची माहीती मिळताच ठाणे पोलिसांनी तत्काळ याप्रश्नी लक्ष घालून, या विदयार्थाना सुरक्षिततेची हमी दिली. याशिवाय उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा शिधाही मोफत पुरवण्याचे काम ठाणे पोलिसांनी बजावले. पूर्वोत्तर तसेच, ईशान्येकडील राज्यातील नागरिक चिनी नागरीकांप्रमाणे दिसतात. त्यामुळे या राज्यांतून मुंबई-ठाण्यात शिक्षणासाठी आलेल्या विदयार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर हल्ले होण्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या होत्या. त्यातच आता मुंबईसह ठाण्यात राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची अनामिक दहशत पसरली असल्याचे समोर आले आहे.
हल्ला होण्याच्या धास्तीने गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर भागातील ब्रम्हांड आणि मुंबईतील मुलुंड परिसरात असे 10 ते 12 विद्यार्थ्यांनी (मुले व मुली) स्वतला घरातच कोंडुन घेतले होते. या विद्यार्थ्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांच्याकडे प्राप्त झाली होती. लोखंडे यांनी ही बाब ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना कळवली. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी तत्काळ या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच, उपायुक्त पाटील यांनी स्वतः पदरमोड करून जीवनावश्यक वस्तुंचे किट बनवुन पोलिसांना करवी या सर्व विद्यार्थाना वाटप केले. या मदतीची उतराई म्हणून विद्यार्थानी ट्वीटरच्या माध्यमातुन मुख्यमंत्री कार्यालयासह ठाणे देखील आभार मानले आहेत.