इतर वैद्यकीय तपासणीसाठी आता कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
ठाणे :
जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत, बाह्य़ारुग्ण, त्यांचे नातेवाईक, इतर वैद्यकीय तपासणीसाठी येणारे रुग्ण यांपैकी कुणालाही करोनाची लागण होऊ नये म्हणून हे रुग्णालय कळवा येथे हलवण्यात आले आहे. तसेच शवविच्छेदनासाठीही अनेकजण मोठय़ा संख्येने येथे येतात. त्यामुळे शवविच्छेदन विभागही बंद केला आहे. या सुविधा कळवा रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जाणार असून जिल्हा रुग्णालय आता केवळ करोना उपचारासाठी राखीव राहणार आहे.
करोना उपचारासाठी जिल्ह्य़ात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा रुग्णांना मुंबईत उपचारासाठी पाठविले जात होते. त्यामुळे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयावर ताण वाढत होता आणि त्याचबरोबर रुग्णांनाही उपचारासाठी मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने करोना उपचारासाठी ३० शासकीय रुग्णालये विशेष रुग्णालये म्हणून नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये ठाणे जिल्हा रुग्णालयातील टी. बी. इमारतीचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्य़ातच करोनाबाधितांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. मात्र या इमारतीशेजारी अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचारासह इतर वैद्यकीय सुविधा सुरू राहणार होत्या.
याशिवाय बाह्य़रुग्ण तपासणी केंद्रही सुरूच राहणार होते. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि बाह्य़रुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण जिल्हा रुग्णालय कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्याचा निर्णय प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुमारे दीडशे रुग्णांना कळव्यातील महापालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या संदर्भात ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.