वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार
वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
ठाणे
भिवंडीतील नागरिकांना टोरंटो कंपनीचा आलेला वाईट अनुभव पाहता ठाण्यातील स्थानिक नागरिकांनी केलेला विरोध, त्यासाठी केलेली आंदोलने, उपोषणे तरीही शासनाने शिळ-मुंब्रा-कळवा परिसरासाठी टोरेंट पॉवर लिमिटेडला 1 मार्च 2020 पासून महावितरणने डिस्ट्रीब्युशन फ्रेंचायझी म्हणून नियुक्त केले. शिळ, मुंब्रा, कळवा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून टोरेंट पॉवर कंपनी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणार आहे. तरी संबंधित परिसरातील ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती टोरेंट पॉवर कंपनीने केली आहे.
अधिग्रहण करण्यापूर्वी बऱयाच ठिकाणी या भागातील वीज नेटवर्कची देखभाल काही काळापासून केली जात नव्हती. 22 मार्च 2020 पासून कोविड -19 साथीच्या रोगामुळे आणि संपूर्ण लॉकडाऊनमुळे, मूळात टोरेंट पॉवर लिमिटेडने या क्षेत्रामध्ये विश्वासार्ह पुरवठा करण्यासाठी नियोजित केलेले आणि आवश्यक म्हणून ठरवलेले नेटवर्क देखभाल आणि सुधारणा कार्य चालू केले जाऊ शकले नाही किंवा ते बंद करण्यात आले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरी आहेत, उन्हाळी हंगाम आहे आणि विजेचा खप वाढत आहे ज्यामुळे लोड मागणीत सुमारे 15 टक्के वाढ झालेली असून नेटवर्कवर ताण वाढला आहे आणि त्या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे अशी माहिती टोरेंट पॉवर कंपनीने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून; तसेच, आगामी पावसाळी हंगाम लक्षात घेऊन; टोरेंट पॉवरने विद्युत नेटवर्क देखभाल दुरुस्ती योजना आखल्या आहेत. ही नेटवर्क देखभाल आणि सुधारणा कार्ये आता केली गेली नाहीत तर पावसाळ्याच्या काळात ही कामे शक्य होणार नाहीत आणि यामुळे पावसाळ्यात मोठ्या नेटवर्क ब्रेकडाउनची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. म्हणूनच, देखभाल दुरुस्तीची कामे करण्याच्या परवानगीसाठी टॉरेन्टने जिल्हाधिकारी, ठाणे यांना परवागी पत्र दिले आहे. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि त्यासाठी सहकार्य करावे. एसएमएसद्वारे ग्राहकांना पूर्व सूचना देऊन नियोजित देखभाल दुरुस्ती उपक्रम राबविला जाईल. या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे टोरेंट पॉवर कंपनीने म्हटले आहे.