शहरांतील कचऱ्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी
कल्याण
सध्याच्या लॉकडाउनमुळे शहरांतील केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला मार्केट, किराणा, बेकरी आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. अन्य दुकाने, बाजारपेठा, कारखाने, उद्योग व इतर अस्थापने बंद असल्याने कल्याण-डोंबिवली शहरांतील कचऱ्याचे प्रमाणही ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या दररोज ३५० टन कचरा गोळा केला जात आहे. केडीएमसी हद्दीतून दररोज ६५० टन कचरा गोळा केला जातो. परंतु, त्यात ४० टक्क्यांनी घट झाल्याने ३५० टन कचरा डम्पिंगवर जात आहे.
महापालिकेसाठी ही बाब समाधानकारक असली तरी आधारवाडी डम्पिंगवरील कच याचा डोंगर कमी झालेला नाही. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे डम्पिंग १५ मे पर्यंत बंद केले जाईल, असे सांगितले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची सगळी शक्ती कोरोनाशी मुकाबला करण्यावर खर्ची होत आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य साध्य करता येणे शक्य नाही.
मात्र, लॉकडाउनच्या काळात कचरा कमी झाला आहे. सध्या घरी असलेल्या नागरिकांनी ओला-सुका कच याचे वर्गीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्यास चित्र बदलू शकते, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी सांगितले.