रेशन दुकानदारांकडून कमी अन्नधान्याचे वाटप- भिंवडीत दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हे
*रेशन दुकानदारांकडून कमी अन्नधान्याचे वाटप*

भिंवडीत दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हे

 


 

ठाणे

:भिवंडी तालुक्यात रेशनिंग दुकानदार लाभार्थ्यांना कमी अन्नधान्य देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी दोन रेशनिंग दुकानदारांविरुद्ध  धान्याचा अपहार केल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजु थोटे यांनी दिली.

 

भिंवडी तालुक्यातील चाणे आणि पालखणे येथील रेशनिंग दुकानदार लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीनंतर भिवंडी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेतील अधिकार्‍यांनी चाणे येथील सुदाम पाटील आणि पालखणे येथील धनंजय भोईर यांच्या दुकानांची तपासणी केली. या तपासणीत नियमानुसार २५ किलो तांदूळ १० किलो गहू लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना तांदूळ आणि गहू प्रत्येकी पाच - पाच किलो दिल्याचे आढळून आले अशाप्रकारे दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाटील आणि भोईर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने रेशनिंग दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. धान्य कमी देणे किंवा विहीत दरापेक्षा जास्त रक्कम घेणे बाब आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा रेशनिंग विभागाने दिला आहे.