बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे करोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने वाढ
ठाणे
ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव झाला असून ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि आदेश काढण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे करोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपर्यंत सर्वाधिक १६१ करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मुंब्रा, कळवा, उथळसर आणि माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांचा सामावेश आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने कळवा आणि मुंब्रा ही दोन्ही शहरे बंदिस्त केली होती. मात्र त्यानंतही या ठिकाणी करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि उथळसर भागांत सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशानंतर तर कळवा आणि मुंब्रा शहरे काही दिवसांपूर्वीच बंदिस्त करण्यात आली होती. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता येथे सर्वच सेवा बंद करण्यात आल्या होत्या. बाहेरील वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कळव्यात करोनाबाधितांच्या संख्येला काही प्रमाणात आळा बसविण्यात प्रशासनाला यश आले असले तरी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. तर मुंब्य्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले असून येथील करोनाबाधितांचा आकडा ३४ झालेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील इतर प्रभागांच्या तुलनेत येथील करोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल उथळसर, कळवा आणि माजीवडा-मानपाडा प्रभागांचा क्रमांक लागतो.