सर्व प्रवेश रस्त्यांची नाकाबंदी कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून आयुक्तांचा निर्णय
शहरात रेड झोन, आँरेज आणि ग्रीन झोनही तयार करण्याचे आयुक्तांचे आदेश, मुंब्रामध्ये 62 इमारती सील.
ठाणे
कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न सापडल्याने कोपरी हे ग्रीन झोन म्हणून घोषित करून कोपरीमध्ये बाहेरची व्यक्ती आत प्रवेश करू नये तसेच कोपरीमधील व्यक्ती बाहेर पडू नये यासाठी कोपरी गावचे सर्व प्रवेश रस्ते सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. शहरात प्रभाग समितीनिहाय ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत ते क्षेत्रफळ रेड झोन म्हणून घोषित करण्याबरोबरच आँरेंज आणि ग्रीन झोनही तयार करण्याच्या सूचना त्यांनी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिल्या आहेत.
ठाणे शहरात आतापर्यंत एकूण 45 कोरोना बाधूत रूग्णांची नोंद झाली असून कळवा, मुंब्रासह इतर अनेक प्रभागांमध्ये कोरोना बाधीत व्यक्ती सापडल्या आहेत. तथापि कोपरी आणि वागळे प्रभाग समितीतंर्गत एकाही कोरोना बाधीत रूग्णांची नोंद झालेली नाही. ज्या क्षेत्रामध्ये एकही कोरोना बाधीत रूग्ण सापडलेला नाही ती क्षेत्रे ग्रीन झोन म्हणून घोषित करणे तसेच त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून त्या क्षेत्रांच्या सीमारेषा आणि प्रवेश रस्ते बंद करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीने कोपरीचे सर्व प्रवेश रस्ते महापालिकेने बंद केले असून कोपरीमध्ये आता बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोपरीतील नागरिकांनाही आता बाहेर पडता येणार नाही.
दरम्यान अशाच पद्धतीने प्रत्येक प्रभागसमितीनिहाय रेड झोन, आँरेंज झोन आणि ग्रीन झोन तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या असून ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत ती ठिकाणे रेड झोन म्हणून घोषित करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या झोनमध्ये कोणतीही बाहेरची व्यक्ती आत येणार नाही आणि आतील व्यक्ती बाहेर येणार नाही याबाबत पोलिसांच्या साहाय्याने सतर्क राहण्याच्या सूचना सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर आँरेंज झोनमध्ये अत्यावश्यक कामासाठीच मर्यादित प्रवेश ठेवण्यात यावा तर ग्रीन झोनच्या बाबतीत सिंघल यांनी ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या क्षेत्राचे प्रवेश रस्ते बंद करून त्या क्षेत्राच्या आतमध्ये कणतीही बाहेरील व्यक्ती प्रवेश करणार नाही यासाठी पोलिसांच्या साहाय्याने कृती आराखडा बनवावा असे निर्देश दिले आहेत.