ठाण्यात मास्क लावणे बंधनकारक- पोलिस आयुक्तांचे आदेश
ठाणे :
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे. पोलीस आयुक्त फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणि प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार नियमावली तयार केली आहे. मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो.
त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या उपायांबरोबरच परस्परांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींच्या बाबतीत मास्क परिधान करणेही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ८ एप्रिल २०२० पासून कोणत्याही कारणास्तव रस्ता, रुग्णालय, कार्यालय आणि बाजारपेठ आदी ठिकाणी जाणा-यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक किंवा शासकीय वाहनातून प्रवास करणा-यांसाठीही हाच नियम लागू राहणार आहे.
कार्यालयांमध्ये काम करतांना तसेच कोणत्याही बैठकीच्या वेळी एखाद्या जमावामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. हे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये लाग राहणार आहेत. * कोणत्याही केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित किंवा घरी बनविलेले (धुण्यायोग्य असे) मास्क धुतल्यानंतर निर्जतूकीकरण करुन पुन्हा वापरता येऊ शकणारे मास्कही वापरता येतील. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई झालेल्या आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे.