जांभळी भाजीपाला मार्केट तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर

जांभळी भाजीपाला मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहरात इतरत्र हलविणार
पाहणी करून आयुक्त सिंघल यांचा आणखी एक महत्वाचा निर्णय



ठाणे


कोरोना कोव्हीडचा संसंर्ग लोकांमध्ये पसरू नये यासाठी वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
       ९ एप्रिल रोजी  सिंघल यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत जांभळी नाका मार्केटची पाहणी केली. यापूर्वीही त्यांनी या मार्केटची पाहणी करून तेथील घाऊक आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याविषयी सुचित केले होते. त्यानंतर मुख्य मार्केट बंद करून ते तलाव पाळी आणि सुभाष पथ याठिकाणी मार्किंग करून तिथे स्थलातंरित करण्यात आले होते. याबाबत महापालिका आणि पोलिस प्रशासनाने अनेकवेळा हस्तक्षेप करूनही सोशल डिस्टन्स नियमाचे उल्लघंन झाल्याने अखेर पाहणी करून महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी सदरचे भाजीपाला मार्केट शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
      सदरचे भाजीपाला मार्केट आता पारसिक रेतीबंदर, पोखरण रोड नं.1, हायलँड मैदान आणि घोडबंदर रोड येथील डी मार्टच्या मागील बोरिवडे मैदान या ठिकाणी स्थलातंरित करण्यात येणार आहे.
      या चारही ठिकाणी आवश्यक त्या किमान सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला आदेशित केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त (2) समीर उन्हाळे, परिमंडळ 2 चे उपायुक्त संदीप माळवी, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती तडवी, ठाणे नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. सोमवंशी, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड आदी अधिकारी होते.