राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८
राज्यात करोनाचा कहर; एकाच दिवशी ७२९ नवे रुग्ण, ३१ मृत्यू
मुंबई
महाराष्ट्रात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ५२२ नवीन रुग्ण आढळले होते तर आज हाच आकडा ७२९ वर पोहचला आहे. करोना मृत्यूंचे प्रमाणही वाढले असून आज दिवसभरात ३१ जण या साथीने दगावले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाबाबतचा तपशील रात्री उशिरा जाहीर केला. आज दिवसभरात करोनाबाधित ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत करोनाबाधित ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २५ रुग्णांचा समावेश आहे. जळगावमध्ये चार तर पुणे शहरातील दोन रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यातील करोना मृत्यूंची संख्या ४०० इतकी झाली आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर १५ महिला आहेत. ३१ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २० रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या ३१ रुग्णांपैकी २० जणांमध्ये (६५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४०० झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,२९,९३१ नमुन्यांपैकी १,२०,१३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९३१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार ०४४ झाली असून, पुण्यातील करोना बळींची एकूण संख्या ७६ इतकी असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा सांगितले.