ठाण्यातील कळवा, मुंब्रामध्ये नाजूक स्थिती, रुग्णांचा आकडा वाढू लागला

 गेल्या दोन दिवसांत ३६ नवीन रुग्णांची नोंद



ठाणे 


करोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्य़ात होत असून  कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे या महापालिका क्षेत्रात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या प्रादुर्भावाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केले असून चाचण्यांची संख्याही वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागला असून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक ८१ रुग्ण ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या पट्टय़ात आढळून आले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत आढळून आलेल्या ८१ रुग्णांपैकी ३६ रुग्ण हे सोमवार आणि मंगळवार या अवघ्या दोन दिवसांत आढळून आले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर, मुंब्रा, कळवा आणि घोडबंदर पट्टय़ातील रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीत समोर आले आहे.


कळवा आणि मुंब्रा शहरातील करोनाबाधितांचा आकडा रोखण्यासाठी ही दोन्ही शहरे पोलिसांना बंदिस्त करावी लागली आहेत. त्यानंतरही मुंब््रयात नागरिकांची रहदारी कायम असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्या आहेत. महापालिकेने या भागातील काही इमारतींच्या प्रवेशद्वारांना कुलपे ठोकली आहेत. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे १२ एप्रिलपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा हा ४६ होता. तर जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडाही १८६ होता. १३ एप्रिलला ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येत थेट ३० ने वाढ झाली. तर १४ एप्रिलला रात्रीपर्यंत आणखी ६ करोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्य़ात एकूण २५६ करोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात ८१ रुग्ण आहेत. जिल्ह्य़ातील इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिकेतील आकडा सर्वाधिक आहे. या ८१ पैकी वर्तकनगर १८, मुंब्रा येथे १७, कळवा येथे १५ आणि घोडबंदर भागात ११ रुग्णांचा समावेश आहे.