महापालिकेने प्राधिकृत केलेल्या हॅास्पीटलमध्येच कोव्हीड बाधित रूग्णांना दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिकेने प्राधिकृत केलेल्या हॅास्पीटलमध्येच कोव्हीड बाधित रूग्णांना दाखल करावे


संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त सिंघल यांचे कडक निर्देश


आदेश न पाळणा-या हॅास्पीटलवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई


 



 


ठाणे 


कोरोना कोव्हीड 19 या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत असून हा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना कोव्हीड बाधित रूग्णांना महापालिकेने प्राधिकृत केलेल्या सिव्हील हॅास्पीटल आणि होरायझन प्राईम या दोन हॅास्पीटलमध्येच दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रूग्णांलयांवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीन्वये कडक कारवाई करण्याचा इशाराही सिंघल यांनी दिला आहे.


            राज्यात 31 मार्च 2020 पासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्याचा अधिनियम निर्गमित करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या खंड 2(1) अन्वये महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड 19 या आजाराच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका हद्दीतील खाजगी रूग्णालयांनी आपल्या रूग्णालयांमध्ये कोरोना बाधीत रूग्ण दाखल करू नये असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.


            महापालिका हद्दीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 2 एप्रिल रोजी सिव्हिल हॅास्पीटल आणि होरायझन प्राईम ही दोन रूग्णालये कोव्हीड रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संशयित व निश्चित निदान झालेल्या कोवीड रूग्णांचे कोव्हीडेत्तर रूग्णांमध्ये संक्रमण टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.


            खासगी रूग्णालयांमध्ये अशा प्रकारे संशयित व निश्चित निदान झालेल्या रूग्णांकडून कोव्हीडेत्तर रूग्णांना होणारे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने सिव्हिल हॅस्पीटल आणि होरायझन प्राईम ही दोन रूग्णालये कोव्हीड 19 रूग्णालये म्हणून प्राधिकृत करण्यात आलेली आहेत. या दोन रूग्णालयांशिवाय इतर कोणत्याही खासगी रूग्णालयामध्ये कोव्हीड बाधीत रूग्ण दाखल न करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी निर्गमित केले आहेत. तसेच सदर रूग्णालयांमध्ये कोव्हीड व नॅान कोव्हीड असे दोन्ही प्रकारचे रूग्ण ठेवल्याचे आढळल्यास अशा रूग्णालयांवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील विवध तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशा इशारा श्री. सिंघल यांनी दिला आहे.