ज्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण आढळत आहेत त्यांना पूर्णपणे लॉकडाउन करण्यात यावे - केंद्रीय पथक

ज्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण आढळत आहेत त्यांना पूर्णपणे लॉकडाउन करण्यात यावे - केंद्रीय पथक



ठाणे :


प्रत्येक महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश शनिवारी केंद्रीय पथकाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकांना दिले. ठाण्यासह जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, मीरा-भाइंदर, उल्हासनगर, नवी मुंबई आदी महापालिकांमधील झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील वाढता धोका लक्षात घेऊन यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक ठाणे जिल्ह्यात आले आहे. या पथकाने सकाळी शनिवारी कौशल्य हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, होरायझन हॉस्पिटल या कोवीड हॉस्पिटल्सना तसेच पारसिकनगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. सुरुवातीला सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून आले.


तेथील नागरिक नियमांचे पालन करीत आहेत. परंतु, त्यानंतर प्रत्येक महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण आढळत आहेत त्यांना पूर्णपणे लॉकडाउन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाइन करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.