गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नवी योजना

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नवी योजना



ठाणे : 


करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, अशा सूचना केल्या जात आहेत. ठाणे पोलिसांनीही जिल्ह्यात सीमाबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर जागोजागी पोलिसांची पथके नाकाबंदी करीत आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसांत एक हजाराहून अधिक वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. अनेकांची वाहने तसेच वाहनांच्या चाव्या जप्त केल्या आहेत. मात्र, तरीही  काही ठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर पडून शहरातील रस्त्यावर वाहनांमधून फेरफटका मारत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाने कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा  आणि दिवा परिसरातील रस्ते आणि गल्लीबोळात वाहतुकीस बंदी घातली आहे.


काही दिवसांपूर्वी मुंब्य्रात राज्य राखीव दलाचे १०० जवानही तैनात करण्यात आले आहेत. तर भिवंडीतही पोलिसांकडून मुख्य मार्गावर नाकाबंदी सुरू आहे. असे असले तरी मुंब्रा आणि भिवंडी शहरातील दाटीवाटीच्या परिसरातील गल्लीबोळात आणि इमारतींच्या गच्चीवर नागरिक गर्दी करीत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही शहरात पोलिसांची पथके ड्रोनच्या कॅमेऱ्याद्वारे विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय, नागरिकांना गर्दी करू नका, अशा सूचना ड्रोनमध्ये बसविलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या जात आहेत. या ड्रोनमधील कॅमेऱ्याद्वारे शहरातील गर्दी टिपणे शक्य होणार आहे. हे कॅमेरे पोलीस उपायुक्त, साहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मोबाइलला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत.