थीम पार्कच्या चौकशीचा फार्स


ठाणे :


थीम पार्कच्या चौकशीचाअहवाल येऊनही अद्याप केवळ विभागीय चौकशीच्या पलीकडे यासंदर्भात कार्यवाही पुढे सरकलेली नसल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच यासंदर्भात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मी महापौर असताना संबंधित ठेकेदारांना दिलेली ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीपलीकडे काहीच झाले नसल्याने त्यांनी आधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. नगरसेवकांनी विचारलेला प्रश्न संबंधित विभागाला पाठवण्यावरून सर्वसाधारण सभेत सचिव विभाग आणि उद्यान विभागांमध्ये असमन्वय दिसून आला. शिंदे यांनी काही प्रश्न विचारले होते. मात्र, मुख्यालय उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपल्याला हे प्रश्न महासभेच्या एक दिवस आधी मिळाले असल्याचा खुलासा केला. यावर सचिव अशोक बुरपुल्ले यांनी मात्र तो २० दिवस आधीच संबंधित विभागाकडे पाठवला असल्याचे सांगून यासंदर्भातील नोंदीदेखील सभागृहात दाखवल्या. यावरून महापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्याचे दिसून आले.