अफवा पसरवल्याचा ठपका, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :
नियंत्रण कक्षाला खोटी माहिती घोडबंदर रस्त्यावरील जी कॉर्प संकुल याठिकाणी गर्दी जमली असल्याची पोलिस नियंत्रण कक्षामध्ये फोन करून खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा पसरवल्याचा ठपका या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.
करोना विषाणूबाबत कोणत्याही प्रकारे अफवा न पसरवण्याविषयी पोलिसांनी आवाहन करूनही, अफवा पसरवल्या जात आहेत. घोडबंदर भागातील एका व्यक्तीने स्वतःला करोना झाल्याचा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला. त्यानंतर आरोग्य विभागाची झोपच उडाली. तात्काळ धाव घेत वैद्यकीय तपासणीत त्या व्यक्तीला करोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु अफवा पसरवल्याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कासारवडवली परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने ही अफवा पसरवली आहे. 'मला करोना झाला असून तब्येत गंभीर होईपर्यंत दवाखान्यात दाखल होणार नाही. तसेच इतर लोकांनाही करोनाबाधित करेन,' असा मेसेज त्यानं व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कासारवडवली पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. वैद्यकीय तपासणीत प्राथमिकदृष्ट्या त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मनाई आदेशाचे ऐनकैन प्रकारे उल्लंघन करण्यात येत असल्याची प्रकरणे घडत आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर भागात एकूण २५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. सर्वाधिक गुन्हे उल्हासनगर परिमंडळात दाखल झाले आहेत. ठाणे शहरात एक आणि दोन परिमंडळ असून दोन्ही परिमंडळे मिळून केवळ एकच गुन्हा दाखल आहे. तर भिवंडीत ८, कल्याण ५ आणि उल्हासनगरमध्ये ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. संचारबंदी असूनही मंगळवारी नागरिकांनी भाजीबाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. शिवाय विनाकारण नागरिक गाडीने रस्त्यावर फिरतही होते. पोलिसांनी मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.