ठाणे महापालिकेतील घोटाळ्यातून ठाणेकरांची लूट-- आमदार संजय केळकर

ठाणे महापालिकेतील घोटाळ्यातून ठाणेकरांची लूट-- आमदार संजय केळकर



ठाणे


ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून घोटाळ्यातून ठाणेकरांची लूट होत आहे त्यामुळं प्रत्येकवेळी ठाणेकरांना न्यायालयातच जाऊन न्याय मिळेल काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला. जुन्या इमारतींचे आयुष्यमान वाढावे यासाठी उभारण्यात आलेल्या वेदरशेड नियमानुकुल करण्यात याव्यात अशी मागणी केळकर यांनी यावेळी केली. रेंटल इमारतींच्या दयनीय अवस्थेबाबतही केळकर यांनी संताप व्यक्त केला. रेंटल इमारतींमध्ये लिफ्ट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य दिसत आहे. सफाई कामगारांची गावदेवी येथील घरं तोडल्यानंतर त्यांना नवीन घरं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.


पण आता २५ वर्ष लोटूनही ही कुटुंबं बेघर असून या सफाई कामगारांची २५ वर्ष सत्ताधा-यांनी बरबाद केल्याचा आरोप केळकर यांनी केला. या सफाई कामगारांना तातडीनं घरं मिळावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येईल असा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी अशी मागणीही केळकर यांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये गौणखनिज प्रकरणी अनेकांकडून शेकडो कोटींची येणे बाकी आहेत. मात्र प्रशासन फक्त नोटीसा देण्याचं काम करत असून वसुली शून्य आहे. ही वसुली तातडीनं करण्यात यावी अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळात केली.


ठामपाचे उत्पन्न आणि राज्य- केंद्राकडून मिळणा-या निधीचा विनीयोग होत नसून विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून लूट होत आहे. खुद्द आयुक्तांनीच घोटाळ्यांमध्ये माफीया असल्याचं कबुल केलं आहे असं सांगत आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळात चौकशीची मागणी केली. अतिक्रमण, टीडीआर, अनधिकृत बांधकामं आदी घोटाळ्यांमध्ये माफीया सक्रीय असल्याची कबुली दिली असं वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. त्यामुळं प्रशासनाचे प्रमुखच असं म्हणत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं केळकर यांनी सांगितलं.ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पास सत्तेत असलेल्या शिवसेनेनं स्थगिती दिली. अनियमिततेबरोबर कागदपत्रं नसताना हे प्रकल्प हाती कसे घेतले जातात असा प्रश्न विचारत केळकर यांनी या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.