महिलांना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण, भारतीय मराठा संघ व रायझिंग स्टारचा उपक्रम
ठाणे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय मराठा संघ आणि रायजिंग स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन कळवा येथे
करण्यात आले होते. यावेळी आंतराष्ट्रीय साहसी खेळाडू, मार्शल आर्ट ट्रेनर अमोल कदम यांनी महिलांना प्रशिक्षणाचे धडे दिले तर कायदे तज्ञ वकील भालेराव यानी महिलांना कायदा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय मराठा संघ आणि रायजिंग स्टार नर्सरीच्या माध्यमातून महिलांसाठी व मुलींसाठी स्व-संरक्षणाचे एक दिवसीय शिबीराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. धावपळीच्या युगात महिलांना अनेकदा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे महिलांच्या अस्मितेला व अस्तित्वाला ठेच पोहोचविणा-या घटना घडतात, अशावेळी महिलांनी स्वत:चे संरक्षण करणे खूपच गरजेचे असते. यामुळे महिलांकरिता स्व-संरक्षणाचे धडे देणे हि काळाची गरज निर्माण झाली असल्याने महिलांकरिता कळवा परिसरात एक दिवशीय मोफत सेल्फ डिफेन्सचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी आंतराष्ट्रीय साहसी खेळाडू, मार्शल आर्ट ट्रेनर अमोल कदम यांनी महिलांना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले. यावेळी महिलांनी प्रशिक्षण घेताना सराव देखील केला. तसेच एखादी घटना घडली कि कशा प्रकारे पोलिसांकडे तक्रार दाखल करायची याबद्दल कायदे तज्ञ वकील भालेराव यांनी महिलांना कायदे विषयक माहिती दिली. या शिबिराला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रायजिंग स्टारच्या ममता मसुरकर, महेश मसुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.