टोळधाडीचे आक्रमण

भारतात सुमारे २६ वर्षांनंतर टोळधाड आली असून, राजस्थानात या टोळधाडीने अक्षरश: हैदोस घातला आहे. टोळ किंवा नाकतोडे लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने शेतावर हल्ला करतात आणि पिकेच्या पिके फस्त करतात. सध्या आफ्रिकी देशांमध्ये या टोळधाडीने कहर केला आहे. राजस्थानात धुमाकूळ घालत असलेली टोळधाड पाकिस्तानातील एका मोठ्या क्षेत्रावरील पिके फस्त करून भारतात आली आहे. हे टोळ किंवा नाकतोडे वाळवंटी प्रदेशातील आहेत. राज्य आणि केंद्र सरकारांची पथके टोळधाड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सध्या करीत आहेत. सामान्यत: जिथे फार लगबग नसते अशा शांत भागात हा वाळवंटी टोळ आढळून येतो. अंड्यांमधून प्रचंड संख्येने प्रजनन होणारा हा कीटक असून, कालांतराने त्याला पंख फुटतात. वाळवंटी प्रदेशातील नाकतोडे कधी-कधी अत्यंत खतरनाक बनतात. लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने जेव्हा ही टोळी येते, तेव्हा जमिनीवर अंधार पडतो, इतकी यांची संख्या असते. एखाद्या शेतात ही टोळधाड आली, तर काही तासांमध्येच संपूर्ण पीक फस्त करून जाते. हिरव्यागार गवताळ मैदानात जेव्हा हे वाळवंटी नाकतोडे प्रचंड संख्येने एकत्रित जमतात तेव्हा ते सर्वसामान्य, शांत भागात राहणारे कीटक राहत नाहीत. त्यांचा व्यवहार बदलतो. अन्य कीटकांप्रमाणे किंवा पतंगांप्रमाणे त्यांचे वर्तन राहत नाही. अशा वेळी सर्व नाकतोडे एकत्र येऊन भयानक स्वरूप धारण करतात. त्यांचा रंगही बदलतो आणि त्यांचा मोठा समूह | विनाशकारी स्वरूपधारण करतो.आकाशात उडत असलेल्या या कीटकांच्या एका टोळीत जवळजवळ दहा अब्ज टोळ एकत्र असू शकतात आणि ते शेकडो किलोमीटरच्या परिसरात विखुरलेले असू शकतात. ही टोळी एका | दिवसाला दोनशे किलोमीटरचा प्रवास उडून पूर्ण करते. आपल्या भुकेसाठी आणि प्रजननासाठी ही टोळी एकाच दिवसात एका मोठ्या क्षेत्रातील पिकांची अपरिमित हानी करू शकते. गेल्या काही दशकांपासून दिसत असलेली जगातील सर्वात खतरनाक टोळधाड सध्या हॉर्न ऑफ आफ्रिका येथील गवताळ मैदानांमध्ये आणि शेतांमध्ये अक्षरश: धुडगूस घालत आहे. पिके आणि गवत नष्ट करीत आहे. या टोळधाडीमुळे त्या संपूर्ण परिसरात खाद्यसंकट निर्माण होऊ शकते. ही टोळधाड सोमालिया आणि इथिओपियामध्ये धूळधाण उडविल्यानंतर केनियातील शेतांमध्ये झंझावाताप्रमाणे घुसली आहे. केनियात हा टोळधाडीचा सत्तर वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला मानला | जात आहे, तर सोमालिया आणि इथिओपियात हा गेल्या २५ वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला आहे. सोमालियात या संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले आहे. पाकिस्ताननेही अशीच घोषणा केली आहे. काही टोळधाडी आगामी काळात युगांडा आणि दिक्षण केनियात पोहोचण्याची शक्यता आहे. टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही, तर आगामी काळात स्थानिक स्वरूपात प्लेगचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाच्या कृषी आणि खाद्य संघटनेने दिला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत टोळधाडींनी इथिओपिया आणि सोमालियातील १,७५,००० एकरपेक्षा अधिक शेतांचे नुकसान केले होते. कृषी आणि खाद्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही टोळधाड एका दिवसात ३५० चौरस किलोमीटर क्षेत्रातील ८ टन अन्नधान्य फस्त करू शकते. टोळांची एक झुंड केनियाच्या ४० ते ६० चौरस किलोमीटर क्षेत्रातधुमाकूळ घालत आहे. स्थानिकटोळधाडीमुळे कृषी उत्पादन घटणार आहे, हे प्रशासनानेही मान्य केले आहे. पूर आणि दुष्काळासारख्या आपत्तींनी नेहमी झगडणाऱ्या एका मोठ्या क्षेत्राला आता या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे आणि तेथे खाद्यसंकट निर्माण होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते, या संकटामुळे २ कोटी लोकांवर आफत ओढवेल. संयुक्त राष्ट्र कृषी आणि खाद्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य टोळधाड अडीच हजार माणसांचे पोट भरू शकेल एवढे धान्य फस्त करू शकते. संयुक्त राष्ट्राच्या मते, २००३ ते २००५ या दोन वर्षांच्या कालावधीत टोळांच्या संख्येत अशीच वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील शेतीचे अडीच अब्ज डॉलर एवढे प्रचंड नुकसान झाले होते; परंतु १९३०,१९४० आणि १९५० च्या दशकांमध्येही टोळधाडींच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आली होती. काही धाडी तर इतक्या खतरनाक असतात की,अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या झुंडीलाच प्लेग नाव दिले जाते. संयुक्त राष्ट्र कृषी आणि खाद्य संघटनेच्या मते, वाळवंटी टोळधाडी जगभरातील दहापैकी एका व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. त्यामुळेच त्यांना जगातील सर्वाधिक खतरनाक कीटकांच्या संवर्गात ठेवले गेले आहे. सध्याच्या संकटाचे मूळ विषम हवामानात आहे, असे मानले जाते. सध्याच्या संकटाचे कारण २०१८-१९ मध्ये आलेली वादळे आणि अतिवृष्टी ही आहेत. वाळवंटी टोळधाडी सामान्यत: दिक्षण आफ्रिका आणि भारताच्या दरम्यान असलेल्या १.६ कोटी चौरस किलोमीटर परिसरात राहणाऱ्या आहेत. दक्षिण अरबस्तानात दोन वर्षांपूर्वी दमट हवामान आणि पर्यावरणीय अनुकूलतेमुळे टोळांची संख्या झपाट्याने वाढली. टोळांच्या तीन पिढया या हवामानावर पोसल्या गेल्या आणि हे कुणाला समजलेही नाही. २०१९ च्या सुरुवातीला पहिली टोळधाड येमेन, सौदी अरेबिया या मार्गाने इराण आणि नंतर पूर्व आफ्रिकेत पोहोचली. गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत नव्या टोळधाडी निर्माण झाल्या आणि केनिया, जिबूती आणि इरिट्रियापर्यंत पोहोचल्या. ज्या देशांवर अनेक वर्षे टोळधाडींचे आक्रमण झालेले नसते,अशा देशांसाठी टोळधाडीशी संघर्ष करणे फारच जिकिरीचे असते. कारण, टोळधाडींविषयी सामान्यज्ञान आणि त्यांच्या मुकाबल्यासाठी पायाभूत संरचना अशा देशांमध्ये तयार नसते. त्यामुळे संकटाची तीव्रता किती तरी पटींनी वाढते.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image