त्या मास्कच्या गोदामाची भिवंडी पोलिसांकडून पाहणी
भिवंडी
भिवंडीतील दापोडा भागामधील एका गोदामात मास्कचा साठा ठेवण्यात येतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मास्कची मागणी वाढल्याचे चित्र आहे. असे असतानाच भिवंडीतील एका गोदामामध्ये परदेशात वापरलेल्या मास्कची धुवून वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भिवंडीतील एका गोदामामध्ये परदेशात वापरलेल्या मास्कची धुवून वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन भिवंडी पोलिसांनी याप्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाला पत्र पाठविले असून त्यात चित्रफितीतील वृत्ताची सत्यता तपासण्यासाठी गोदामाची पाहाणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान शेख नावाची व्यक्ती विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री करण्याचा प्रयत्न करत होता. वळ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल कदम यांच्या तक्रारीनंतर इम्रान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर रविवारी रात्री उशिरा हे मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. भिवंडीत परदेशातून आलेल्या भंगारात मास्कची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. करोना व्हायरसमुळे मास्कला असलेली मागणी लक्षात घेता इम्रान शेख हे मास्क धुवून विकण्याचा प्रयत्न करत होता. पण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचा भांडाफोड झाला. यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांकडे तक्रार देत मास्क नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी गोदामातील मास्कची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी जिल्हा आरोग्य विभागासह अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना केली असून, या कारवाईसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.