मुंब्रा-कळवा परिसरासाठी टोरंट कंपनीची नेमणूक

मुंब्रा-कळवा परिसरासाठी टोरंट कंपनीची नेमणूक
शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध मावळला



 ठाणे 
मुंब्रा. शिळ आणि कळवा परिसरात वीज वितरण आणि देयक वसुलीचे कंत्राट टोरंट या खासगी कंपनीला देऊ नका, या मागणीसाठी आंदोलने करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तेवर येताच विरोधाची तलवार म्यान करत या कंपनीच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजप सरकारने भिवंडी महापालिकेचा २८५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या टोरंटला करमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या विरोधानंतरही टोरंट कंपनीला कंत्राट देऊ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षात असताना टोरंट कंपनीला विरोध केला होता. मुंब्रा, शिळ आणि कळवा या परिसरात वीज वितरण आणि वसुलीचे कंत्राट टोरंट या खासगी कंपनीला देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यानुसार २६ जानेवारी २०१९ पासून ही कंपनी परिसरात काम सुरू करणार होती. मात्र, या खासगीकरणाला नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला होता. तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे स्थानिक नेते दशरथ पाटील हे आहेत. खासगी कंपनीमुळे ग्राहकाला वीजदेयकात मोठा भुर्दंड बसणार असून महसुलातही तूट येणार असल्याचा दावा समितीने केला होता. 
तसेच या कंपनीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे नेते आणि नागरिक सहभागी झाले होते. मुंब्रा, शिळ आणि कळवा या विभागासाठी टोरंट या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून या कंपनीद्वारे येत्या १ मार्चपासून परिसरात वीजसेवा देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाऱ्या आणि वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचलित दरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या विभागातील ग्राहकांना दजे दार सेवा देण्याकरिता कोणत्याही अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी तक्रारीचे निवारण झाले नाही तर महावितरणद्वारे स्थापन केलेल्या नोडल कार्यालयाच्या माध्यमातून निवारण करण्यात येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image