पुढील काही दिवस पेट्रोल पंप सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु

पुढील काही दिवस पेट्रोल पंप सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु



मुंबई


मुंबईतील पेट्रोल डिलर असोसिएशनने पुढील काही दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पेट्रोल डिलर्स असोसिएशनने आज परिपत्रक जारी करत याविषयी माहिती दिली. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले सर्व खबरदारीचे उपाय आम्ही पाळत होतो. मात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना घरातून कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस बंदोबस्तामध्ये काही कर्मचाऱ्यांना प्रश्नांना उत्तर द्यावी लागत असून, काही कर्मचाऱ्यांना लाठीमारही सहन करावा लागल्याचं संघटनेचे अध्यक्ष एम. वेंकट राव यांनी म्हटलं आहे.


रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्या यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी नेहमी तत्पर आहेत. मात्र सध्याच्या घडीला मुंबईत अनेक ठिकाणी खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल्स बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण होतो. पेट्रोल पंपावर काम करणारे अनेक कर्मचारी हे मुंबई आणि लगतच्या भागांमधून येत असतात, त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागतेय. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे प्रवासात वेळ वाया जातोय. या सर्व गोष्टी लक्षात घेता…पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल पंप हे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील, असं संघटनेने स्पष्ट केलं.