ऑन ड्युटी पोलिसांसाठी सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशची सुविधा

ऑन ड्युटी पोलिसांसाठी सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशची सुविधा


नगरसेवक सुनिल सोनी यांचा स्तुत्य उपक्रम



अंबरनाथ


केवळ टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केल्याने काही होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मदतीची हाक देणे गरजेचे आहे. याचा प्रत्यय अंबरनाथमध्ये आला आहे. नगरसेवक सुनिल सोनी यांनी  शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र सतर्क असलेले सरकारी कर्मचारी आणि पोलिसांसाठी  हॅण्डवॉश आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था असलेले एक लहानसे स्टॅण्ड तयार केले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वत:चे हात सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशने सातत्याने धुण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. मात्र शहरातील ऑन ड्यूटी पोलिसांना ही सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत होती. सोनी यांनी ही सोय उपलब्ध केल्यामुळे पोलिसांनीही समाधान व्यक्त केले आहे.


करोनाचा संसर्ग राज्यात वाढत आहे. त्यामुळे शहरात जनता कर्फ्यू आणि संचारबंदीसारखे निर्णय लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांचा वावर कमी करण्यासाठी आणि शहरात करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये, यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी दिवसरात्र सज्ज आहेत. मात्र कर्तव्य बजावत असताना, सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचा शेकडो नागरिकांशी संपर्क होत आहे. मात्र रस्त्यावर आणि स्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना, त्यांना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्क जरी उपलब्ध असले तरी हात धुण्यासाठी हॅण्डवॉश आणि पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. अखेर यासाठी अंबरनाथ पश्चिम भागातील नगरसेवक सुनिल सोनी यांनी सरकारी कर्मचारी आणि पोलिसांसाठी स्वखर्चाने शहरातील पश्चिम भागात आठ आणि पूर्व भागात चार असे हॅण्डवॉश आणि हात धुण्यासाठी पाण्याची सुविधा असलेल्या एका स्टॅण्डची सोय केली आहे. शहरातील एसीपी कार्यालय, अंबरनाथ पोलिस ठाणे, उलन चाळ, भाजी मार्केट विम्को नाका या ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक आणि शिवाजी नगर पोलिस ठाणे या ठिकाणी ही सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी दर तासाला पाणी आणि हॅण्डवॉश रिफिल करण्यात येत असून, शहरात येणाऱ्या नागरिकांनाही याचा उपयोग होत असल्याचे नगरसेवक सुनिल सोनी यांनी सांगितले आहे. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image