कोरोनाचा होळीवरही परिणाम
पिचकाऱ्यांच्या किमतीत वाढ
ठाणे
जागतिक बाजारपेठेत चिनमधून निर्यात होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचा मोठा वाटा असून या देशाची उत्पादन क्षमता अधिक असल्याने जगभरात या देशातून विविध वस्तूंची आयात केली जाते. मात्र, चीनमधून जगभरात पसरत चाललेल्या ‘करोना’ विषाणूचा परिणाम हा जगभरातील आयात निर्यातीवर झाला आहे. भारतीय बाजारपेठेलाही त्याचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून होळीच्या सणासाठी वापरण्यात येणाऱ्या पिचकाऱ्यांची आयात यंदा झालेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी होळीच्या सणासाठी चीनमधून मोठय़ा प्रमाणात पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. विविध आकारांच्या पिचाकाऱ्यांच्या किमतीही कमी असतात. मात्र, करोना विषाणुमूळे आयात झाली नसल्याने बाजारात पिचकाऱ्यांच्या किंमती वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील बाजारपेठांमध्ये देशी बनावटीच्या पिचकाऱ्या मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. चीनमधील पिचकाऱ्या ५० रुपये ते ३०० रुपयांर्पयच्या किंमतीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर, भारतीय पिचकाऱ्यांची किंमत १०० रुपये ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. या पिचकाऱ्यांची किंमत चीनी पिचकाऱ्यांपेक्षा अधिक असल्याने ग्राहकही या पिचकाऱ्या खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे पिचकाऱ्यांच्या मागणीत ५० टक्क्य़ांनी घट झाली असून विकेत्यांचे नुकसान झाले आहे.