ग्रामस्थांनी घेतला निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय
कल्याण :
नवी मुंबई महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रभागरचनाही जाहीर झालेली असून, या १४ गावांच्या वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. मात्र, यावेळीही निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित असलेले आमदार पाटील यांनीही बहिष्काराच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभेतील १४ गावांनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. दहिसर येथे गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मनसेचे स्थानिक आमदार प्रमोद (राजू) पाटील हे देखील उपस्थित होते.
गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. ठाणे तालुक्यातील ही १४ गावे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतात. भौगोलिकदृष्ट्या ती नवी मुंबईजवळ आहेत. काही वर्षांपूर्वी ही गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली. त्यामुळे त्या गावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आली. परंतु, विकास रखडल्याने ग्रामपंचायत नको. गावांचा महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी २०१५ पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे.