शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांना साजेसे झाले
लेखक, कलावंतांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
ठाणे, ता. 2 :
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात भव्यदिव्य असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लक्षवेधक स्मारक महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून साकारले गेले आहे. या स्मारकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी विविध माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी तर आहेच शिवाय बाळासाहेबांच्या कलाप्रेमी कर्तृत्वाला साजेसेच असल्याची दाद नामवंत लेखक, कलावंत यांनी हे स्मारक पाहताना दिली.
महापौर नरेश म्हस्के यांच्यासमवेत संगीतकार कौशल इनामदार, अभिनेते सुबोध भावे, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, रवि जाधव यांनी नुकतीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली.
संपूर्ण स्मारकाची पाहणी केली असता, बाळासाहेबांच्या जीवनातील सर्व महत्वपूर्ण घटकांचा बारकाईने विचार करुन त्या योग्य पध्दतीने मांडल्या आहेत. यामध्ये निश्चीतच महापौर यांची कल्पकता दिसून येते. या स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाळासाहेबांच्या अस्तीत्वाची जाणीव झाल्या शिवाय राहणार नाही असे भावोद्गगार संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले. तर बाळासाहेबांच चरित्र या स्मारकामधून उलगडत असून ते थेट हृदयास भिडते व ही आम्हा तरुणांना निश्चीतच प्रेरणादायी आहे असे मत अभिनेते सुबोध भावे यांनी व्यकत केले.
शिवसेनाप्रमुख हे व्यंगचित्रकार होते हे जरी सर्वांना ज्ञात असले तरी ते भावी पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून ज्ञात होतील. नव्या पिढीला निश्चीतच हे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांची कलेवर असीम निष्ठा होती. कलेचा व कलाकारांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला आहे, त्यामुळे या स्मारकात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे मत दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले.
6 फेब्रुवारीला या स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, लोकार्पणानंतर या स्मारकास दररोज ठाणेकर भेट देत असून याठिकाणी कलाप्रेमीं एकत्र येवून कार्यक्रम देखील सादर करीत आहे. तसेच या ठिकाणी संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते सुबोध भावे यांनी या ठिकाणी कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली असून लवकरच या कलावंतांची कला ठाणेकरांना पाहायला मिळेल असेही महापौरांनी यावेळी नमूद केले. ठाणे हे कलावंतांचे शहर म्हणून देखील नावारुपास येत आहे, या शहरात अनेक विविध क्षेत्रातील नामवंत वास्तव्यास आहे, या कलावंतांच्या तसेच नवोदित कलावंतांना देखील कला सादर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असेही महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.