ठाणे : ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला डावलून केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २४ तासांत मागे घेण्याची नामुष्की ओढवल्यामुळे संतप्त झालेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अत्यंत शेलक्या शब्दांत ठरावीक अधिकाऱ्यांचा उद्धार केल्याने महापालिका वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. काही अधिकारी राजकीय नेत्यांचे बटीक असल्याचा उल्लेख करत जयस्वाल यांनी शिवीगाळ केलेल्या या संदेशाचे छायाचित्र (स्क्रीनशॉट) प्रसारित झाल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यात काही अधिकाऱ्यांना आईबहिणीच्या नावाने जयस्वाल यांनी अपशब्द वापरल्याने प्रशासकीय वर्तुळात नाराजी आहे. ठाणे महापालिकेतील चार उपायुक्तांसह पाच सहायक आयुक्तांच्या गेल्या शनिवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी तसे लेखी आदेश काढले होते. या बदल्यांमध्ये वादग्रस्त उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपविण्यात आल्याने ठरावीक अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. यापैकी काही अधिकाऱ्यांनी ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालताच त्यांनी तातडीने या बदल्या स्थगित करण्याचे तोंडीआदेश संबंधितांना दिले. त्यामुळे अवघ्या ४८ तासांत बदल्या रद्द करण्याचे आदेश काढण्याची नामुष्की आयुक्त जयस्वाल यांच्यावर ओढवली. यामुळे संतापलेल्या आयुक्त जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नाराजी व्यक्त करत काही अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. या संदेशात जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांचे नाव न घेता त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरून शेलक्या भाषेचा वापर केल्याने इतर अधिकारीआवाक झाले. या संदेशाचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाले आहेत. त्यात आयुक्तांनी वापरलेल्या अपशब्दामुळे अधिकाऱ्यांचे कुटुंबीय व्यथित झाले आहेत. याबाबत अधिर्कायांच्या कुटुंबीयांनी महिला आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंबंधी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्यासाठी जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांच्याशी संपर्क साधला असता आयुक्त बाहेरगावी आहेत असे उत्तर त्यांनी दिले. प्रशासनात कोणतीही दुही नाही तसेच व्हॉटस्अॅप संदेशाविषयी माहिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
अस्वस्थ आयुक्तांची व्हॉट्सअॅप शिवीगाळ