जीवनाश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी घाबरून जावू नये
भाजीपाला मार्केट, औषध दुकाने आणि धान्य दुकाने येथे सोशल डिस्टन्स ठेवा.
विशेष बैठकीत मनपा आयुक्त सिंघल यांचे आवाहन
भायंदरपाडा येथे नवीन विलगीकरण कक्ष.
ठाणे :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घाबरून न जाता भाजीपाला मार्केट, औषध दुकाने, धान्य दुकाने येथे गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व ठाणेकर नागरिकांना केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी पडणार नसून बिग बझार, डी मार्टच्या माध्यमातून सोसायट्यांना धान्य पोहोचविण्याबाबत प्रशासन विचार करीत असल्याने याबाबत नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहनही सिंघल यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त सिंघल यांनी आज वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी सर्वप्रथम महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, आरोग्य केंद्रे, गर्दीची ठिकाणे, भाजीपाला मार्केटस सोडियम हायपोक्लाराईटसने निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर फुटपाथ आणि फुटपाथला लागून असलेले रस्ते निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
सद्यस्थितीत भाजीपाला मार्केटस, धान्य दुकाने, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी नागरिकांनी पुरेसे अंतर न ठेवता मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी परिमंडळ उपायुक्त यांनी त्यांच्या प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्तांमार्फत भाजीपाला विक्रेत्यांमध्ये किमान १० फुटाचे अंतर ठेवण्यास सांगावे तसेच जे विक्रेते या सूचना पाळणार नाहीत त्यांच्यावर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्याच्या सूचना सिंघल यांनी दिल्या. त्याचप्रमाणे धान्य दुकाने आणि मेडिकल स्टोअर्स येथेही सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत सूचित केले. जीवनाश्यक वस्तूंच्या बाबतीत नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. याबाबत बिग बझार, डी मार्ट यांच्याशी चर्चा करून सोसायट्यांपर्यंत धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये असे सांगितले. त्याचप्रमाणे कोरोनाबाबत तातडीच्या मदतीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरात येणा-या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग होणार
ठाणे शहरामध्ये येणा-या मुख्य आणि इतर अशा विविध १२ प्रवेशद्वारांवर येणा-या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
शहराच्या विविध भागामध्ये भाजी विक्री करणा-या विक्रेत्यांनी आपापसांत किमान १० फुटांचे अंतर ठेवण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून श्री. सिंघल यांनी परिमंडळ उपायुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जे भाजी विक्रेते या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे ८ बेडचा विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आला असून कल्याणफाटा येथील टाटा हाऊसिंगच्या रेंटल इमारतीमध्येही विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील भायंदरपाडा येथील लोढा कॅाम्प्लोक्समध्ये रेंटल अंतर्गत प्राप्त झालेल्या सी विंगमधील ७८० सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी देणाचे मान्य केले आहे. त्यामुळे भायंदरपाडा येथे नवीन विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष
टोल फ़्री -1800 222 108
हेल्प लाईन-022 25371010